सरते वर्ष आणि त्याच्या खुणा...


         दर वर्षी प्रमाणेच 2020 चे देखील स्वागत लोकांनी धूमधडाक्यातच केले. कोणालाही अंधूकशी कल्पनादेखील नव्हती, की 2020 हे वर्ष केवढे मोठे संकट, अगदी मानवतेचे अस्तित्व धोक्यात येईल येवढे मोठे संकटं घेवुन येईल याचे. 

         बघता-बघता दोन महिने सरले नि मार्च आला, सोबत कोरोनाचे संकट जगावरती घेऊन. सुरूवात तर कोरोनाची 2019 मध्येच झाली होती, परंतु त्याचा हाहाकार 2020 मध्ये सुरू झाला. एका देशाचा निष्काळजीपणा म्हणा किंवा त्याचा आडमुठेपणा म्हणा, त्याची किंमत सार्या जगाला चुकवावी लागली, लाखो लोकांचे प्राण गमवुन. 

         एका छोट्याशा शहरामधून निर्माण झालेला हा कोरोनारूपी राक्षस हळूहळू अजस्त्र रुप धारण करून आपले पाय ईतर देशांमध्ये पसरायला लागला. सुरूवातीला याचे गांभीर्य कोणाला कळले नाही, परंतु जेव्हा या राक्षसाने युरोप सारख्या विकसित देशांमध्ये, जिथे सगळ्यात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध आहे, तिथे आपले आक्राळ-विक्राळ रूप धारण करून हजारो लोकांना गिळंकृत केले तेव्हा कुठे जगाने याला गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली. ते म्हणतात ना संकट जोपर्यंत स्वताच्या दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे गांभीर्य समजत नाही, अगदी तसेच. किड्या मुंग्यांसारखे लोक रस्त्यावर तडफडून प्राण सोडत होते. हे सारे विकसित देश ह्या राक्षसापुढे हतबल झाले होते. त्यांनी अगदी हातच टेकले होते.

        हळूहळू मग जगातील ईतर देशांमध्ये देखील याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. आणि मग, एकामागून एक असे करत सगळ्या देशांनी लाँकडाऊन (टाळेबंदी) लागू करायला सुरूवात केली. सगळे देशच जणु एक बंदी शाळा बनले. याला आपला भारत देश देखील अपवाद नव्हता. खर्या अर्थाने या कोरोनारूपी अजस्त्र राक्षसाविरुध्द लढाईला सुरुवात झाली. सुरूवातीला 1 महिन्याची टाळेबंदी हळुहळू वाढतच गेली. 

        हा काळ खर्या अर्थाने लोकांसोबतच प्रशासन, डॉक्टर यांचा परिक्षा पाहणारा काळच होता जणु. सामान्य माणसं घरातुनच लढत देत होते, प्रशासन निर्णय आणि धोरणातून तर पोलीस रस्त्यावर उतरून आणि सर्वात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे डॉक्टरांची. हो डॉक्टरांच्या रुपाने जणु देवच उभा ठाकला होता सर्वांच्या मदतीला. स्वतःचे प्राण संकटात घालून ते रात्रंदिवस ह्या कोरोनारूपी राक्षसाच्या विरोधात पीपीटी किटरूपी सुरक्षा कवच घालुन उभे ठाकले होते. अनेकांचे सुरक्षा कवचच भेदून या राक्षसाने त्यांना गाठले. काही त्या हल्ल्यातून वाचले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले. पण हे योध्दे याला घाबरून पाठ दाखवून परागंदा झाले नाहीत, अगदी शेवटपर्यंत लढत राहीले, अजुनही लढतायत.  

        टाळेबंदी किती यशस्वी झाली याला काळ आणि देश साक्षी आहे. सुरुवातीला लोक याला सामोरे गेले पण जसजसा वाढत गेला तसतसा लोकांचा धीर सुटायला सुरुवात झाली. आपल्या घरच्यापासुन दूर किती दिवस राहायचे. खाण्या-पिण्याचा म्हणजेच पोटाचा देखील प्रश्न होताच. जे अडकुन पडले होते त्यांना हालाकीत दिवस काढावे लागले, मग ते कामगार, मजदूर,  विद्यार्थी यांना बर्याच अडचणीतून जावे लागले. त्या लोकांचा धीर सुटायला लागला. कामगारांना तर फक्त कोरोनाशीच लढायचे नव्हते. त्यासोबतच त्यांच्या पोटा-पाण्याचा देखील प्रश्न होताच की. त्याचा विचार कोणी केलाच नाही. मग त्यांनी काहीही करून घरी जायचेच या उद्देशाने  कायदे झुगारून देवुन घरी जाण्यासाठी कोणी पायी तर कोणी दुधाचे टँकर जसे सापडेल तसा प्रयत्न केला. पैसे वाले लोक गेले घरी, परंतु कामगारांची होरपळ मोठ्या प्रमाणावर झाली, अनेकांना तर आपले प्राण गमावलेले. जिवंतपणी तर घरी जाता आले नाहीच पण मेल्यानंतर तरी कुठे नशीबात होते ते. दुर्दैव म्हणावे की काळच प्रभावी होता म्हणावे? 

         प्रत्येक जण आपआपल्या परीने लढत होता. स्पर्धेच्या या युगात धावणारा माणूस त्याला थांबने कधी माहीतच नव्हते, पण आज थांबायची वेळ आली होती, घरी राहायची वेळ आली होती. कोणी हा वेळ नवनव्या गोष्टी शिकून, वाचन करून, लिखाण करून आपले छंद जोपासून सत्कारणी लावला. तर अनेकांना मानसिक आजारांना, सोबतच कुपोषण, बेरोजगारी, लठ्ठपणा सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. शारीरिक, कौटुंबिक समस्यांना सामारे जावे लागले. यातुन लोकांना फिटनेसचे महत्त्व कळले. काहींनी घरच्यांसोबत वेळ घालावला. तर काहीमध्ये भांडण, डिवोर्स पर्यंत प्रकरणे गेली. म्हणजेच चांगल्या गोष्टीही घडल्या आणि वाईट देखील. शेवटी या दोन्हीही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्या सोबतच असतात. आपण कोणती स्वीकारतो हे महत्त्वाचे.  

         कोण आपले कोण परके हे ही जाणुन घेता आले. म्हणजेच जे वास्तव होते ते समोर आले. ह्या काळात एक गोष्ट समोर आली, की आपण ज्या गोष्टी अशा आहेत असे समजत होतो त्या तशा नसुन त्या जशा आहेत तशा समोर आल्या म्हणजेच काय तर खरे काय खोटे काय हे नजरेस आले. लोकांना वास्तवाचे जाण झाले. लोकांचा दिखावुपणा नजरेस आला, स्वार्थीपणा नजरेस आला. दूसरीकडे असेही लोक होतेच की दूसर्यांसाठी काहीतरी करत होते, म्हणजे लोकांचा चांगुलपणा देखील जवळुन पाहता आला.  

         लोकांना स्वताच्या गावामध्ये जायला देखील मज्जाव होता या काळात. त्यावेळी अशी परिस्थिती होती, की शहरातून कोणी गावी आला की लोकं त्याच्याकडे अशी पाहयची की जणु 'जादू' सिनेमातला जादूच परग्रहावरून पृथ्वीवर आला आहे. आज त्याच गावांमध्ये लोकांना फोन करून यायची निमंत्रणे जायला लागलीत, कारण गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागल्यात. बाकी काळ कितीही बिकट येवो राजकारणाला काही मरण नाही, ते अमर आहे. 

         या काळात सरकारने देखील आपल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोपरि प्रयत्न केले. ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनेक  योजना, धोरणी राबविली. आत्मनिर्भरतेवर जोर दिला. यातूनच आपली सध्या लोकल टू ग्लोकल वाटचाल सुरू झाली आहे. डॉक्टरांनी देखील जीवाची बाजी लावून लढा दिला, अगदी रात्रीचे दिवस केले.पोलीसांनी जीवावर उदार होवून रात्रंदिवस आपली भूमिका चोख बजावली. या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत देश सदैव यांचा ऋणी राहील.

-शिवाजी पाटील

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...